मुंबई- शेतकऱ्यांसह सर्वांकडून आतुरतेने वाट पाहिली जात असलेला मान्सून आज गोव्यामध्ये दाखल झाला आहे. पुढील २ ते ३ दिवसांत महाराष्ट्रात दाखल होण्यास अनुकूल वातावरण असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.
तसेच गोव्यानंतर आता पुढच्या काही दिवसांतच मान्सून सीमा ओलांडून महाराष्ट्रात दाखल होण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार पुढील दोन तीन दिवसांमध्ये मान्सून महाराष्ट्र, आंध्र प्रदेश आणि ईशान्येकडील राज्यांमध्ये पुढे सरकण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे. तसेच ५ ते ९ जून दरम्यान कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे, असे हवमान खात्याने म्हटले आहे. दरम्यान,समुद्र प्रचंड खवळलेला राहण्याची शक्यता असल्याने ५ जून ते १० जून २०२६ या काळात दक्षिण महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक आणि केरळचा किनारी भाग, तसेच लक्षद्वीप आणि पूर्व-मध्य अरबी समुद्रात मासेमारीसाठी न जाण्याचा इशारा मच्छिमारांना देण्यात आला आहे.