चिपळूण : अलोरे ब्रीज ते एनएच-६६ महामार्गाला जोडणाऱ्या पुलाची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. दोन वर्षांपूर्वी या पुलाच्या दुरुस्तीसंदर्भात तहसील कार्यालयाला निवेदन देण्यात आले होते; मात्र शासनाकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.

आज हा पूल स्वतःचे अस्तित्व गमावण्याच्या स्थितीत पोहोचला आहे. पावसाळ्यात या पुलावरून वाहतूक करणे धोकादायक ठरू शकते. पूल संपूर्णपणे ढासळलेल्या अवस्थेत उभा असून, पुराच्या पाण्यामुळे कधी कोणती दुर्घटना घडेल, हे सांगता येत नाही. त्यामुळे या पुलाच्या सुरक्षिततेची शाश्वती देता येत नाही.

या पार्श्वभूमीवर पावसाळ्यात हा पूल वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात यावा, अशी मागणी करणारे निवेदन तालुका प्रशासनाला देण्यात येणार आहे.