मुंबई : ऑपरेशन टायगर’शी भाजपा आणि शिवसेनेचा काहीही संबंध नाही तर ‘ऑपरेशन टायगर’ उबाठातील अंतर्गत शीतयुद्ध आणि वादामुळे होत आहे. संजय राऊत ज्या पद्धतीची भाषा वापरतात, त्यामुळेच हे घडत आहे. संजय राऊत, तुम्हाला तुमचे खासदार तुमच्यासोबत ठेवता येत नाहीत, तुम्हाला तुमचे विचार तुमच्यासोबत ठेवता येत नसल्याने उबाठा गटाची ही अवस्था झाली आहे. हा काही बांगलादेश किंवा पाकिस्तान नाही. तुमची दादागिरी इथे सहन केली जाणार नाही. तुम्ही कोणाला धमकावत असाल तर जशास तसे उत्तरही दिले जाईल, असा घणाघात भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी बुधवारी केला.भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
संजय राऊत यांना अश्लील शब्द वापरण्याची सवय आहे. कमरेखालचे शब्द वापरायचे, लोकांना शिव्या द्यायच्या. त्यांच्या याच भाषेवर महाराष्ट्रातील जनता रोज थुंकते आणि त्यांची रोज इज्जत काढते. परंतु ज्यांची इज्जत संपलेली असते त्यांना त्याचे काहीही पडलेले नसते. त्यांनी रोज असे शब्द वापरणे, अजून काही म्हणणे, यात काही नवीन नाही, अशा शब्दात श्री. बन यांनी फटकारले.
श्री. बन पुढे म्हणाले, आई-बाबा आणि साईबाबांची शपथ घेऊन माणसे टिकवता येत नाहीत, पक्ष वाढवता येत नाही. वंदनीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर निष्ठा ठेवली असती तर संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांच्यावर ही वेळ आली नसती. लोक का सोडून जात आहेत? कारण तुम्ही आपल्या वडिलांचे विचार सोडले, हिंदुत्वाचे विचार सोडले आणि काँग्रेसच्या दावणीला जाऊन बसलात. येत्या काळात उबाठा गटाची आणि संजय राऊत यांची यापेक्षाही वाईट अवस्था होणार आहे. मुळात टायगर कोण आहे आणि शेळी कोण आहे, हे महाराष्ट्रातील जनतेने दाखवून दिले आहे. संजय राऊत, आता गाढव नाक्यावर गाढवपणा करणे एवढेच तुमच्याकडे शिल्लक आहे.
ऑपरेशन टायगरमागे भाजपा, शिवसेना नव्हे तर उबाठातील अंतर्गत राजकारणच – नवनाथ बन यांनी काढली संजय राऊत यांची खरडपट्टी
