रत्नागिरी:शहर आणि परिसरात ऑनलाईन आर्थिक फसवणुकीच्या घटना वाढल्या असून, बँकेतून परस्पर पैसे लंपास करण्याचा एक मोठा प्रकार उघडकीस आला आहे. बँक ऑफ इंडियाच्या शाखेतून अज्ञात इसमाने ऑनलाईन पद्धतीने तब्बल ५,८६,००९ रुपये (पावणेसहा लाख रुपये) चोरून नेल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रत्नागिरीतील मारुती मंदिर परिसरातील बँक ऑफ इंडियाच्या शाखेत शांतिनगर येथील रहिवासी धीरज अर्जुन भानुशाली यांचे बचत खाते आहे. २५ जुलै २०२६ रोजी संध्याकाळी ६:३६ ते ७:३७ या अवघ्या एका तासाच्या कालावधीत अज्ञात भामट्याने या खात्यातून ऑनलाईन पद्धतीने सायबर सेंध लावत ५ लाख ८६ हजार ९ रुपये परस्पर वळवून घेतले.
आपल्या मित्राची आर्थिक फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर, या प्रकरणी कर सल्लागार राजेश रमेश सोहनी (रा. आश्रय शांतिनगर, नाचणे) यांनी ३१ जुलै २०२६ रोजी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
फिर्यादीवरून रत्नागिरी शहर पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध:
भारतीय न्यायसंहिता (BNS) २०२३ चे कलम ३१८ (४)
माहिती तंत्रज्ञान (IT) अधिनियम २००० चे कलम ६६ (डी)
अंतर्गत गु.र.नं. २५४/२०२६ अन्वये गुन्हा नोंदवला आहे. सायबर पोलीस या अज्ञात भामट्याचा शोध घेत असून पुढील तपास सुरू आहे.
रत्नागिरीत ऑनलाईन फसवणुकीत बँकेतून पावणेसहा लाख लंपास..अज्ञात भामट्याविरुद्ध गुन्हा दाखल.
