सावर्डे : राज्य शासनाच्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना – २०२६ अंतर्गत काही पात्र शेतकरी लाभापासून वंचित राहण्याची शक्यता लक्षात घेऊन आमदार शेखर निकम यांनी राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची भेट घेत सविस्तर निवेदन सादर केले.
निवेदनाद्वारे आमदार शेखर निकम यांनी योजनेतील काही निकषांमुळे नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांवर अन्याय होत असल्याचे निदर्शनास आणून दिले. शासनाच्या निर्णयामुळे लाखो शेतकऱ्यांना दिलासा मिळणार असला तरी काही पात्र शेतकरी कर्जमाफी अथवा प्रोत्साहनपर लाभांपासून वंचित राहण्याची शक्यता असल्याचे त्यांनी नमूद केले.
आमदार शेखर निकम यांनी निवेदनात म्हटले आहे की, १ एप्रिल २०१९ ते ३१ मार्च २०२५ या कालावधीत कर्ज घेतलेल्या काही शेतकरी सभासदांची ३१ मार्च २०२५ रोजी कर्जखाती थकबाकीदार होती. मात्र त्यानंतर संबंधित शेतकऱ्यांनी आपली कर्जाची संपूर्ण परतफेड करून बँका व संस्थांना सहकार्य केले आहे. अशा प्रामाणिक शेतकऱ्यांनाही कर्जमाफी अथवा प्रोत्साहनपर लाभ मिळावा आणि त्यांचा योजनेत समावेश करण्यात यावा, अशी मागणी आमदार शेखर निकम यांनी केली आहे.
