मंडणगड – लाटवण पंचक्रोशी मराठी माध्यमिक विद्यामंदिर, लाटवण येथे भारत सरकारच्या देशव्यापी ‘नशामुक्त युवा फॉर विकसित भारत 2.0’ अभियानांतर्गत नशामुक्ती जनजागृती कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. प्रशालेचे मुख्याध्यापक राजकुमार सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात सौरभ घोसाळकर यांनी उपस्थितांचे स्वागत करून अभियानाचे महत्त्व स्पष्ट केले. आजच्या तरुण पिढीला विविध व्यसनांनी ग्रासले असून, त्यामुळे देशाची युवा शक्ती वाया जात आहे.
प्रत्येकाने आपली जबाबदारी ओळखून नशामुक्त जीवन जगण्याचा संकल्प करावा, असे आवाहन त्यांनी केले. मुख्याध्यापक राजकुमार सूर्यवंशी यांनी, “आजची तरुण पिढी ही देशाचे उज्ज्वल भविष्य आहे. भारत हा जगातील सर्वात तरुण देश म्हणून ओळखला जातो. देशाच्या विकासासाठी युवा पिढीने नशामुक्त राहण्याचा निर्धार करणे गरजेचे आहे,” असा संदेश दिला. यानंतर उपस्थित शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी नशामुक्त राहण्याची सामूहिक शपथ घेतली. या कार्यक्रमास ज्येष्ठ शिक्षिका चव्हाण मॅडम, सचिन दहिभते, सौरभ घोसाळकर, तसेच शिक्षकेतर कर्मचारी कृष्णा दळवी, संजय सोंडकर आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेवटी सचिन दहिभते यांनी उपस्थितांना शुभेच्छा देत आभार मानले. त्यानंतर कार्यक्रमाची सांगता झाली.
