चिपळूण : परशुराम एज्युकेशन सोसायटीच्या युनायटेड इंग्लिश स्कूल, चिपळूणतर्फे यंदाही ‘माझा देश, मी देशाचा’ या उपक्रमांतर्गत ‘एक राखी सैनिकांसाठी’ हा अभिनव उपक्रम राबविण्यात येणार आहे. सोमवार, १७ ऑगस्ट रोजी सकाळी साडेदहा वाजता या उपक्रमाला सुरुवात होणार असून, संस्थेच्या विविध शाखांमधील सुमारे ४२०० विद्यार्थी यात सहभागी होणार आहेत.
परशुराम एज्युकेशन सोसायटीच्या चिपळूणमधील गद्रे इंग्लिश मीडियम स्कूल, प्रेमाजीभाई आसर मराठी माध्यम स्कूल, गुरुकुल, तसेच अन्य शाखांमधील विद्यार्थिनींनी सैनिकांसाठी स्वतः राख्या तयार केल्या आहेत. या राख्यांसोबत शाळेचे पत्र आणि राखी तयार करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या हाताचे ठसेही असणार आहेत. प्रत्येक सैनिकापर्यंत राखी पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.
देशाच्या सीमेवर कर्तव्य बजावणाऱ्या जवानांप्रती कृतज्ञता व्यक्त करणे, तसेच विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीची भावना आणि सैनिकांबद्दल आदर निर्माण करणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. कार्यक्रमाच्या प्रारंभी मातृभूमी पूजन आणि राखी पूजन करण्यात येणार आहे. शाळेत शिकणाऱ्या ज्या विद्यार्थ्यांचे वडील सैन्यात कार्यरत आहेत, त्यांच्या मातांच्या हस्ते राखी पूजन करण्यात येणार आहे.
यानंतर विद्यार्थी राख्या घेऊन रॅलीद्वारे चिपळूण पोस्ट कार्यालयाकडे रवाना होतील. गुरुकुलच्या विद्यार्थ्यांचे लेझीम पथक रॅलीचे नेतृत्व करणार आहे. रॅलीच्या मार्गावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन करण्यात येणार असून, चिपळूण नगर पालिकेतील शिवाजी महाराज पुतळ्याचेही पूजन होणार आहे. राख्या घेऊन जाणाऱ्या विद्यार्थ्यांवर पुष्पवर्षाव करून त्यांचे स्वागत करण्यात येणार आहे.
रॅलीनंतर सैनिकांना पाठविण्यासाठी राख्या पोस्ट कार्यालयात सुपूर्द करण्यात येतील. यावेळी संस्थेचे पदाधिकारी, शासकीय अधिकारी, पोलिस अधिकारी, तसेच नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. प्रांताधिकारी आकाश लिगाडे, मुख्याधिकारी संजय मोहिते, तहसीलदार प्रवीण लोकरे यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित राहणार आहेत. पोलिस आणि शासकीय अधिकारी यांच्यासाठी रक्षाबंधनाचा कार्यक्रमही आयोजित करण्यात येणार आहे.
रॅली शाळेत परतल्यानंतर सहभागी सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात येईल. त्यानंतर कार्यक्रमाची सांगता होणार आहे. मागील वर्षी या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता. यंदा संस्थेचे १२५वे रौप्य महोत्सवी वर्ष सुरू असल्याने या उपक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
