चिपळूण : लोणी काळभोर, पुणे येथील महात्मा गांधी विद्यालयाच्या सेवानिवृत्त शिक्षिका सौ. गोदावरी रामचंद्र वाघमारे (वय ७१) यांचे शुक्रवारी (दि. ९ ऑक्टोबर) दुपारी साडेतीनच्या सुमारास अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनामुळे लोणी काळभोरसह करमाळा परिसरात शोककळा पसरली आहे. त्या चिपळूण येथील आदित्य ऑर्थो अँड आय केअरचे संचालक डॉ. गोपीचंद वाघमारे यांच्या मातोश्री होत.
सौ. गोदावरी वाघमारे यांनी शिक्षण क्षेत्रात मोलाचे योगदान दिले. महात्मा गांधी विद्यालयात शिक्षिका म्हणून सेवा बजावताना त्यांनी अनेक विद्यार्थ्यांना घडविण्याचे काम केले. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी त्यांनी घेतलेले परिश्रम आणि दिलेले संस्कार यामुळे त्यांच्याविषयी विद्यार्थी व सहकाऱ्यांमध्ये आदराची भावना होती.
त्यांनी आपल्या चारही मुलांना उच्च शिक्षण दिले. त्यांच्या मुलांमध्ये डॉ. नितीन वाघमारे, डॉ. गोपीचंद वाघमारे, डॉ. कल्पना आयरे आणि डॉ. कविता सोनवणे यांचा समावेश आहे. मुलांच्या शिक्षणासाठी आणि उज्ज्वल भविष्यासाठी त्यांनी घेतलेले कष्ट, दिलेले संस्कार आणि केलेले मार्गदर्शन यामुळे वाघमारे कुटुंबाने वैद्यकीय क्षेत्रात आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली.
त्यांच्या निधनाची बातमी समजताच नातेवाईक, मित्रपरिवार, माजी विद्यार्थी तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी दुःख व्यक्त केले. पुण्यातील कोरेगाव पार्क येथील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी सामाजिक, शैक्षणिक, वैद्यकीय आणि राजकीय क्षेत्रातील अधिकारी, पदाधिकारी तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. त्यांनी दिवंगत सौ. गोदावरी वाघमारे यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
त्यांच्या पश्चात चार मुले, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने वाघमारे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
