खेड : ज्ञानदीप शिक्षण प्रसारक मंडळ, खेड (रत्नागिरी) संचलित कै. प्रभाकर गजानन कांबळे ज्ञानदीप विद्या मंदिर, भडगाव (माध्यमिक विभाग) येथील गणित विषयाचे सहायक शिक्षक श्री. संदेश लक्ष्मण जाधव यांना रिजनल टीचर्स ऑर्गनायझेशन (RTO), दापोली यांच्यावतीने रत्नागिरी जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक विद्यारत्न पुरस्कार-२०२६ प्रदान करण्यात आला आहे. त्यांच्या या यशाबद्दल शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
रिजनल टीचर्स ऑर्गनायझेशन (RTO) या संस्थेमार्फत शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे शिक्षक, मुख्याध्यापक आणि शैक्षणिक संस्थांना पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. शैक्षणिक क्षेत्रात सातत्याने उल्लेखनीय योगदान देणारे शिक्षक संदेश जाधव यांच्या कार्याची दखल घेत त्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. संदेश जाधव हे गेल्या १५ वर्षांपासून शिक्षण क्षेत्रात कार्यरत असून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी सातत्याने प्रयत्नशील आहेत. गणित विषयाचे प्रभावी अध्यापन, शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी तसेच ऑलिम्पियाड परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून त्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेत वाढ करण्यासाठी ते प्रयत्न करीत आहेत. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधण्याच्या उद्देशाने ते विविध शैक्षणिक उपक्रमांत योगदान देत आहेत.
त्यांच्या या शैक्षणिक कार्याची दखल घेऊन RTO, दापोली यांच्याकडून त्यांना मिळालेला हा पुरस्कार ज्ञानदीप परिवारासाठी अभिमानाची बाब ठरली आहे. त्यांच्या यशाबद्दल संस्थेचे पदाधिकारी, प्रशालेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालकांकडून अभिनंदन करण्यात येत आहे.