पोलादपूर : तालुक्यातील अतिदुर्गम डोंगराळ भागातील महालगुर आडाचीवाडी येथे एका गाईला विहिरीवर टाकलेल्या हिरव्या रंगाच्या जाळ्यात आंबा पडल्याचे दिसताच गाईने उडी मारली आणि हिरव्या जाळ्यासह गाय 50 फूट खोल विहिरीत पडली. मात्र ग्रामस्थांनी या गाईला विहिरीतून सुखरूपपणे बाहेर काढले.
आडाचीवाडी येथील विहिरी जवळ पाण्याची तहान लागल्याने गाय आली असता विहिरीवर पिण्याच्या पाण्यामध्ये कचरा पडू नये, यासाठी हिरव्या रंगाच्या जाळीने विहिर झाकण्यात आली होती. या हिरव्या कापडी जाळीवर झाडावर आंबा पडल्याने गाईला मोह आवरता आला नाही आणि जाळीवर पडलेला आंबा खाण्यासाठी गाईने उडी घेतली आणि गाय सुमारे 50 फूट खोल विहिरीत कोसळली. शनिवारी सकाळी 10 वाजताच्या सुमारास विहिरीत पडलेल्या गाईला बाहेर काढण्यासाठी ग्रामस्थांनी कंबर कसली. ग्रामस्थांनी आपसात समन्वयाने दोरीच्या साह्याने अथक प्रयत्नानंतर गाईला बाहेर काढले.
आडाची वाडी येथील शेतकरी कुटुंबातील माजी सरपंच विलास बाबू उतेकर यांच्या मालकीची गाय सकाळी गावाशेजारी विहिरीजवळ पाण्यासाठी विहिरीजवळ आली. सुदैवाने विहिरीत पाणी असल्याने गाय तरंगत राहिल्याने बचावली.
