लांजा :(गोविंद चव्हाण) : हेरीटेज कल्चर आर्ट अँड एज्युकेशन डेव्हलपमेंट सोसायटी संचलित, प्राथमिक आश्रमशाळा जावडे येथे शनिवार, दि. ०४ जुलै रोजी विद्यार्थ्यांसाठी पारंपरिक भात लावणी उपक्रम उत्साहात आयोजित करण्यात आला यावेळी विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष पावसात भात लावणीचा अनुभव घेतल्याने विद्यार्थी आनंदित झाल्याचे दिसून आले.
या उपक्रमात विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष शेतात उतरून भातशेतीचा अनुभव घेतला. रोप काढणे , नांगरणीची माहिती जाणून घेणे, भाताची लावणी करणे, मातीत खेळणे तसेच पावसात भिजत कोकणातील निसर्गरम्य वातावरणाचा आनंद घेणे, अशा विविध अनुभवांमधून विद्यार्थ्यांनी शेती संस्कृतीची प्रत्यक्ष ओळख करून घेतली. यावेळी शेतकरी गीतांच्या तालावर विद्यार्थ्यांनी आनंदाने नृत्य सादर केले. उपक्रमाच्या शेवटी सर्वांनी भेळीचा आस्वाद घेत आनंद द्विगुणित केला.
संस्था प्रमुख संतोष कांबळे यांच्या संकल्पनेतून तसेच जावडे गावातील शेतकरी बांधवांच्या मोलाच्या सहकार्याने या उपक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या अनुभवात्मक शिक्षण उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये शेतीविषयी आदर, श्रमसंस्कार, निसर्गप्रेम आणि ग्रामीण जीवनाची जाणीव निर्माण झाली.
विद्यार्थ्यांनी हा उपक्रम मनापासून अनुभवत भरभरून आनंद लुटला. उपस्थित शिक्षकांनीही अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळत असल्याचे मत व्यक्त केले.
