रसायनी : दिल्लीतील विद्यार्थ्यांवर झालेल्या क्रूर लाठीमार आणि अमानुष हल्ल्याच्या निषेधार्थ पुकारण्यात आलेल्या ‘महाराष्ट्र बंद’च्या अनुषंगाने रसायनी परिसरात तीव्र पडसाद उमटले. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत रसायनीत सर्वपक्षीय निषेध मोर्चा काढण्यात आला.
या बंद दरम्यान रसायनी परिसरातील व्यापारी वर्ग, कामगार वर्ग, विद्यार्थी तसेच विविध राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटनांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत आपला पाठिंबा दर्शवला. आंदोलनादरम्यान परिसरातील रिस,चांभार्ली,मोहोपाडा,वावेघर,आदी परिसरातील सर्व दुकाने आणि बाजारपेठ पूर्णपणे बंद ठेवण्यात आली, मात्र नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून अत्यावश्यक सेवा सुरू ठेवण्यात आल्या होत्या. मोर्चाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यावेळी काही वेळ रास्ता रोको करण्यात आला तर प्रशासनाविरोधात आणि विद्यार्थ्यांच्या समर्थनात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. “विद्यार्थ्यांवरील अन्याय सहन केला जाणार नाही, धर्मेद्र प्रधान राजीनामा द्या, तानाशाही नही चलेगी” असा नारा देत उपस्थितांनी लोकशाही मूल्यांचे रक्षण करण्याची मागणी केली. तर काहींनी आपली भावना व्यक्त करत जनतेसमोर प्रतिक्रिया मांडल्या.
या संपूर्ण बंद आणि मोर्चाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी रसायनीतील पोलीस यंत्रणा सतर्क असल्याचे पाहायला मिळाले.
