मुंबई : दिवाळीच्या आसपास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाची माहिती मिळाली होती. ऑक्टोबर-नोव्हेंबरपासूनच खरातचे गैरव्यवहार चव्हाट्यावर आले होते. गृहविभाग पुरावेही गोळा करत होता. मग मुख्यमंत्री सहा महिने झोप काढत होते का?, असा संतप्त सवाल उपस्थित करत, खरात प्रकरणामुळे सुरू असलेली विकृत चर्चा महाराष्ट्रासाठी चांगली नाही, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे.
बुलढाणा येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ पुढे म्हणाले की, अशोक खरातचे प्रकरण अंधश्रद्धेतून निर्माण झाले आहे. यातून आपण धडा घेतला पाहिजे आणि वैज्ञानिक दृष्टीकोन बाळगला पाहिजे. अंधश्रद्धा कोण वाढवत आहे, धर्माधर्मात व जाती-जातींमध्ये वाद कोण निर्माण करत आहे, द्वेष कोण पसरवत आहे, हे सर्वांना माहित आहे. यातूनच खरातसारख्या विकृती जन्माला येतात, याची दखल घेतली पाहिजे. २०२४ पासून देवेंद्र फडणवीस राज्याचे गृहमंत्री आहेत. त्यांच्या कार्यकाळात अशोक खरातसारख्या विकृतीने महाराष्ट्रात थैमान घातले आहे. आताही जाणीवपूर्वक हे प्रकरण रेंगाळत ठेवण्याचे काम मुख्यमंत्री करत आहेत. मित्रपक्षांना जेरीस आणण्याचा त्यांचा प्रयत्न आहे, हे निषेधार्ह आहे. या प्रकरणात रुपाली चाकणकर यांचा राजीनामा झाला आहे, पण इतर संबंधितांचे काय? त्यांच्यावर गुन्हे दाखल करून कारवाई केली पाहिजे. खरातशी संबंधित असलेल्यांना जनाची नाही तर मनाची लाज वाटली पाहिजे, असेही सपकाळ म्हणाले.
समाजभान गुंडाळून ठेवल्यानेच खरातसारखे विकृत निर्माण होतात. खरात प्रकरणात काही जण अंधश्रद्धेचे बळीही ठरले आहेत. अंधश्रद्धा निर्मूलनाचा कायदा करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे. डॉ. नरेंद्र दाभोलकरांनी अंधश्रद्धा निर्मूलनासाठी आयुष्यभर लढा दिला. त्यांचे काम पुढे नेले पाहिजे व अंधश्रद्धा निर्मूलनाचा संकल्प केला पाहिजे, जेणेकरून खरातसारखी विकृती महाराष्ट्रात पुन्हा निर्माण होणार नाही, असेही सपकाळ म्हणाले.
राज्यात मंत्रीच मार खातात..!
सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत सत्ताधारी महायुतीतच जुंपली आहे. मंत्री शंभुराजे देसाई व मकरंद पाटील या दोन मंत्र्यांना पोलिसांनी मारहाण केली, असे तेच सांगत आहेत. महाराष्ट्रात मंत्रीच मार खात आहेत, हे लोकशाही रसातळाला गेल्याचा मोठा पुरावा आहे. तसेच साताऱ्यात जे झाले, त्यातून वोटचोरीवर शिक्कामोर्तब झाले आहे, असेही हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.
अशोक खरातप्रमाणे भ्रष्टाचाराचीही विकृती..
आमदार संजय गायकवाड यांच्याबद्दल बोलताना हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, आमदार गायकवाड ज्या विकासाच्या वल्गना करत आहेत, त्यांनी कोणत्या गावात किती पैसे खर्च केले, याची श्वेतपत्रिका काढावी. सर्व कंत्राटे त्यांच्या घरात व नातेवाईकांकडेच आहेत. रेतीची अवैध कामे कोण करत आहे? मटक्याची दुकानेही त्यांचीच आहेत. ३५ कोटी रुपयांच्या कमिशनवर पाणी सोडले. सायकलवर फिरणाऱ्या कार्यकर्त्यांकडे फॉर्च्युनर कार आली, असे ते सांगत आहेत. तर ते स्वतः ज्या कोट्यवधींच्या डिफेंडर कारमध्ये फिरतात, ती कोठून आली, हेही त्यांनी सांगावे. आमदार झाल्यापासून आतापर्यंत त्यांची संपत्ती किती पटीने वाढली, हेही त्यांनी जाहीर करावे. निराधार लोकांना घरे बांधून देण्यासाठी २० एकर जमीन दान केली होती, त्याचे काय झाले, हेही सांगावे. महाराष्ट्रात अशोक खरातची विकृती समोर आली, तशीच भ्रष्टाचाराचीही विकृती समोर येत आहे. हे चिंताजनक आहे, असेही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.
