रोहा : रोहा तालुक्यात दोन दिवस निर्माण झालेल्या पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर तातडीची आढावा बैठक घेत खासदार सुनील तटकरे यांनी प्रशासनाला जनतेच्या अडचणी तातडीने सोडविण्याचे आदेश दिले. आपत्कालीन परिस्थितीत प्रशासनाने अधिक सतर्क राहून पूरग्रस्तांना त्वरित मदत मिळेल यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्याच्या स्पष्ट सूचना त्यांनी यावेळी दिल्या.
पूरग्रस्त भागातील नागरिकांच्या घरांमध्ये पाणी शिरल्याने मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून शेती, कुक्कुटपालन तसेच इतर जोडधंद्यांनाही मोठा फटका बसला आहे. या पार्श्वभूमीवर कोणतीही दिरंगाई न करता सरसकट पंचनामे करण्याचे आदेश देत नुकसानग्रस्तांना शासनाची मदत तातडीने मिळावी यासाठी प्रशासनाने प्रयत्न करावेत असे निर्देश खासदार तटकरे यांनी दिले.
या बैठकीस जिल्हा परिषद उपाध्यक्ष मधुकर पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विनोद पाशिलकर, सभापती विजया पाशिलकर, उपसभापती संजय मांडलूसकर, माजी नगराध्यक्ष समीर शेडगे, जि.प.सदस्या निधी नरेंद्र जाधव, नगरपालिकेचे सभापती रवींद्र चाळके, राजेंद्र जैन, महेंद्र दिवेकर, महेश कोलाटकर,महेंद्र गुजर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दयानंद सूर्यवंशी, मुख्याधिकारी अजय कुमार एडके यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
यंदा पाऊस उशिरा सुरू झाल्याने भातपेरण्या उशिरा झाल्या आणि त्यानंतर आलेल्या पुरामुळे अनेक शेतकऱ्यांची भातशेती पाण्याखाली गेली. त्यामुळे कृषी विभागानेही शेतकऱ्यांच्या नुकसानीचा सविस्तर आढावा घेऊन आवश्यक कार्यवाही करावी असे त्यांनी सांगितले. तसेच तालुक्यात खताचा कोणताही तुटवडा निर्माण होणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचनाही संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या.
